राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत जोरदार पावसाचा इशारा

पुणे, 13 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकण आणि घाट भागात तसेच पुणे, सातारा, मुंबई, ठाणे या भागांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. सोबतच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाने शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

https://x.com/Hosalikar_KS/status/1812025365100974229?s=19

https://x.com/airnews_mumbai/status/1811999142115201172?s=19

https://x.com/ANI/status/1812001958040903846?s=19

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी

दरम्यान, मुंबईत आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच आज सायंकाळी 4.39 वाजता समुद्रात 3.69 मीटर उंच भरती देखील आहे, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला आजच्या दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

https://x.com/Indiametdept/status/1812031430484271354?s=19

या राज्यांना देखील पावसाचा इशारा

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गोवा गुजरात आणि तेलंगणा येथे पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आज पहाटे पडलेल्या पावसाने येथील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तापमानात घट झाल्याने दिल्लीतील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *