पुणे, 09 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या बहुतांश ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोकण, आणि मध्य हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://twitter.com/Indiametdept/status/1799728375508181040?s=19
दोन दिवस रेड अलर्ट
कोकण आणि गोवा येथील वेगवेगळ्या जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यादरम्यान, 64.5 मिमी ते 204.4 मिमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ही आज आणि उद्या 64.5 मिमी ते 204.4 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://twitter.com/Indiametdept/status/1799730869835538693?s=19
या ठिकाणी पावसाची शक्यता
यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, मुळदे आगरी, कुडाळ, देवगड, मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर यांसारख्या गावांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शाहूवाडी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या पावसाळी वातावरणात नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.