दिल्ली, 02 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडक उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांत आजच्या दिवशी उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, सबंधित राज्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि पाणी सोबतच ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1785655220007006623?s=19
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1785913359982002210?s=19
येत्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा धोका
मे महिन्यातील येत्या 8 ते 11 दिवसांत गुजरात, दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिन्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच उर्वरित राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशाचे काही भाग, छत्तीसगड आणि इतर ठिकाणी मे महिन्यात 5 ते 7 दिवस उष्णतेची लाट राहील, असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण आहे. या काळात उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी हवामान विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय, मे महिन्यात ईशान्य भारताचा काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी कडक उन्हासाठी तयार राहावे, इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.