पुणे, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) ताडी पिण्याच्या किरकोळ वादातून वानवडी येथील सरकारमान्य ताडी दुकानात झालेल्या मारहाणीत 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघा आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अशी घडली घटना
याप्रकरणी, सोहेल कुरेशी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील मलंग मेहबुब कुरेशी (वय 60, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हे 25 एप्रिल रोजी वानवडी परिसरातील शांतीनगर येथील सरकारमान्य ताडीच्या दुकानात गेले असता, तेथे आकाश हरिश्चंद्र धांडे (वय 20, रा. लक्ष्मी पार्क, कोळसा गल्ली, मोहम्मदवाडी, पुणे) याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला. यानंतर आकाश दांडे आणि त्याचे साथीदार अदिल हनीफ शेख व पांडा ऊर्फ पांडुरंग नामदेव पवार यांनी संगनमताने मलंग कुरेशी यांना मारहाण केली आणि लोखंडी दरवाज्याच्या चौकटीवर जोरात ढकलले. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
या घटनेनंतर वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 115(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अदिल शेख आणि पांडा यांना तात्काळ अटक केली. तर मात्र, मुख्य आरोपी आकाश दांडे हा फरार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. त्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती.
मुख्य आरोपीला सातारा जिल्ह्यातून अटक
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, पोलिसांना आकाश दांडे साताऱ्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वानवडी पोलिसांचे तपास पथक साताऱ्यातील नामदेव वडार वाडी येथे पोहोचले असता तो तेथून निघून गेला होता. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आनेवाडी येथे शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या तीनही आरोपी वानवडी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.