सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान! मोदींसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात

वाराणसी, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सध्या मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगडमधील एका जागेचा समावेश आहे. लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत.

https://twitter.com/ANI/status/1796715796363984960?s=19

904 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

या लोकसभा निवडणुकीत एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात सुमारे 10 कोटी 60 लाखांहून अधिक मतदार आहेत. हे मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे , तर हे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. देशातील बहुतांश भागांत सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. उन्हाचा धोका लक्षात घेता मतदारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने उपाययोजना केल्या आहेत. तसेच मतदान सुरळीत आणि पारदर्शक व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वाराणसी मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणौत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे याची देखील चर्चा सध्या सुरू आहे. तसेच लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती या पाटलीपुत्र मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यांसारख्या अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *