देशात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेच्या 96 जागांसाठी आज मतदान; पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन

पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96 जागांवर मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 17.7 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 12.49 लाख मतदार 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या मतदानामध्ये आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील मतदानाकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1789832127086809148?s=19

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देश वासियांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत मोदींनी एक ट्विट केले आहे. “लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे. चला, आपण सगळे आपले कर्तव्य बजावूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया!” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात या राज्यांमध्ये आज मतदान

या टप्प्यात 10 राज्यांतील एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश 25, तेलंगणा 17, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र प्रत्येकी 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी 8, बिहार 5, ओडिशा आणि झारखंड प्रत्येकी 4 आणि जम्मू-काश्मीरमध्ये एका जागेवर मतदान होणार आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला आहे.

हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, भाजप नेते गिरीराज सिंह, जेडीयूचे राजीव रंजन सिंग, तृणमूल काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा आणि क्रिकेटपटू युसूफ पठाण हे भाजपचे नेते अर्जुन मुंडा आणि माधवी लता आणि आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख वायएस शर्मिला महाराष्ट्रात बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्यात मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *