लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात

मुंबई, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 1625 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल आपले नशीब आजमावत आहेत. तर पहिल्या टप्प्यात अंदाजे 16.86 कोटी मतदार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सुमारे 1.86 लाख मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

या जागांवर मतदान होत आहे 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये आज राजस्थानमधील 12, उत्तर प्रदेशातील 8, मध्य प्रदेशातील 6, बिहारमधील 4, पश्चिम बंगालमधील 3, आसाम आणि महाराष्ट्रातील 5, मणिपूरमधील 2, त्रिपुरातील 1, जम्मू-काश्मीरमधील 1 आणि छत्तीसगड 1, तामिळनाडू 39, मेघालय 2, उत्तराखंड 5, अरुणाचल प्रदेश 2, अंदमान निकोबार बेट 1, मिझोराम 1, नागालँड 1, पुद्दुचेरी 1, याशिवाय सिक्कीमच्या एका जागेवर आणि लक्षद्वीपच्या सर्व लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.

राज्यात 5 जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात देखील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या 5 जागांचा समावेश आहे. दरम्यान आज या निवडणुकीत कोणताही अनुचित किंवा गैरप्रकार प्रकार घडू नये, यासाठी देशातील सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *