पंढरपूर, 17 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात आज आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीसाठी आज पंढरपूर नगरी सजून गेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा पार पडली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बाळू शंकर अहिरे (वय 55) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय 50) या सर्वसामान्य दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. ते नाशिक जिल्ह्यातील अंबासन गावचे रहिवासी आहे. हे दाम्पत्य मनाचे वारकरी असल्याने त्यांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका वर्षाचा मोफत एसटी बस पास देण्यात आला. दरम्यान, एसटी महामंडळातर्फे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मानाच्या वारकरी दाम्पत्याला एका वर्षाचा मोफत एसटी पास देण्यात येतो.
https://x.com/mieknathshinde/status/1813385231426351263?s=19
https://x.com/mieknathshinde/status/1813396386085560748?s=19
बळीराजाला सुजलाम सुफलाम ठेव!
“राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे,” असे साकडे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातले. तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचे मला सौभाग्य मिळाले. गेली 3 वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे, असे मागणे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवाकडे मागितले.
या सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे हे उपस्थित होते. तसेच यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर आदी मंत्री उपस्थित होते.