दिल्ली, 12 मे: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. 14 वर्षांच्या आपल्या कसोटी कारकिर्दीत विविध परिस्थितींमध्ये, विविध संघांविरुद्ध आणि वेगवेगळ्या खंडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना त्याने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिले. फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी लक्षणीय ठरली. कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.
https://www.instagram.com/p/DJiwQm0RbiM/?igsh=MW5zamIyMXQzM3VnNA==
विराट कोहलीने काय म्हटले?
“कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू परिधान करून खेळण्यास सुरुवात करून 14 वर्षे झाली. मी या प्रवासाची कल्पनाही केली नव्हती. या फॉर्मेटने मला खूप काही शिकवलं, तपासलं आणि आकार दिला. पांढऱ्या कपड्यांत खेळताना एक वेगळंच आत्मिक समाधान असतं. शांत मेहनत, दीर्घ खेळाचे तास, आणि अनेक क्षण जे जगाला दिसत नाहीत, पण आयुष्यभर लक्षात राहतात,” असं कोहलीने आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं.
“या फॉर्मेटपासून दूर जाणं सोपं नाही, पण आता ते योग्य वाटतंय. मी माझं सर्व काही या खेळात दिलं आणि याने मला अपेक्षेपेक्षा खूप काही दिलं. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने यावर विराम देतोय – या खेळासाठी, सहकाऱ्यांसाठी, आणि प्रत्येक त्या चाहत्यासाठी ज्याने मला नेहमी साथ दिली. मी कायम हसत हसत माझ्या कसोटी कारकिर्दीकडे पाहीन,” अशी भावना त्याने शेवटी व्यक्त केली.
कसोटी कारकिर्द कशी?
36 वर्षीय विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 123 सामने खेळले असून त्यात त्याने 56.85 सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद 254 धावांची आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर (15,921), राहुल द्रविड (13,265) आणि सुनील गावसकर (10,122) आहेत.
2011 मध्ये कसोटीत पदार्पण
2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर, सुरुवातीची काही सामने विशेष ठरले नाहीत. मात्र 2012 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेलं त्याचं पहिले शतक (116 धावा) निर्णायक ठरलं. त्या मालिकेत भारतासाठी त्याने सर्वाधिक 300 धावा केल्या होत्या.
कसोटी कारकिर्दीचा सुवर्णकाळ
2016 ते 2019 या काळात विराटच्या कसोटी कारकिर्दीचा सर्वोत्तम काळ होता. या काळात त्याने 43 कसोटींमध्ये 66.69 च्या सरासरीने 4,208 धावा केल्या. यामध्ये 16 शतके, 10 अर्धशतके आणि 7 दुहेरी शतकांचा समावेश होता, जी कसोटी इतिहासात एका कर्णधाराने केलेली सर्वाधिक दुहेरी शतके आहेत.
लॉकडाऊन नंतर कामगिरीत घसरण
मात्र 2020 नंतर त्याच्या कामगिरीत घसरण झाली. या दशकात त्याने 39 कसोटींमध्ये केवळ 30.72 च्या सरासरीने 2,028 धावा केल्या. 2023 हे वर्ष काहीसं उजळ ठरलं, जिथे त्याने 8 कसोटीत 671 धावा केल्या.
शेवटची मालिका अपयशी ठरली
विराट कोहलीची शेवटची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होती, जिथे त्याने 9 डावांमध्ये 190 धावा केल्या. त्याने शेवटचं शतक पर्थमध्ये झळकावलं, तर भारतात शेवटचं शतक अहमदाबादमध्ये 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलं होतं.
यशस्वी कारकिर्द
दरम्यान, विराट कोहलीची कारकिर्द ही सातत्य, आत्मविश्वास आणि भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये उंचावलेल्या यशाचा प्रवास होती. 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 692 धावा करत चार शतके झळकावली, 2018 मध्ये इंग्लंडमध्ये 593 धावांची पुनरागमन कारकीर्द गाजवली आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्येही कर्णधार म्हणूनही त्याने नाव कमावलं. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विराट कोहलीची कसोटी कारकिर्द नेहमीच आठवणीत राहील.