ईव्हीएम हॅक झाल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा खोटा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खोट्या व्हिडिओ प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक आणि छेडछाड करण्याचा हा दावा खोटा आणि निराधार असल्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1863121758380785926?t=BIZbP6JZoY6_l50wTWsO1g&s=19

खोट्या व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल

काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये एक व्यक्ती राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची फ्रिक्वेन्सी बदलून ईव्हीएम हॅक आणि त्यामध्ये छेडछाड केल्याचा खोटा आणि निराधार दावा करत आहे. याप्रकरणी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी शनिवारी (दि.30) रात्री या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यानुसार, या व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 318/4 तसेच आयटी कायदा, 2000 च्या कलम 43 (जी) आणि कलम 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

ईव्हीएम हे एक स्वतंत्र मशीन आहे, जे कोणत्याही व्यक्तीद्वारे कोणत्याही वायफाय किंवा कोणत्याही ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच ईव्हीएम पूर्णपणे छेडछाड प्रतिबंधक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक वेळा ईव्हीएमवर त्यांचा विश्वास दाखवला आहे. सोबतच भारताच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तपशीलवार प्रश्नांची उत्तरे आधीच प्रकाशित केली आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ईव्हीएमवर अशाचप्रकारे खोटा दावा करणारी घटना यापूर्वीही समोर आली होती. याप्रकरणी 2019 मध्ये दिल्लीत त्याच व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. जो व्यक्ती आता दुसऱ्या देशात लपला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यामध्ये दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *