परभणी, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज (दि.11) परभणी शहरात बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. त्यावेळी संतप्त झालेल्या भीम अनुयायींनी दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ देखील केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. त्यामुळे परभणी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार आज दुपारी 1 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे.
https://x.com/ANI/status/1866793994468094162?t=17nT_fThw0gds53XHVfgTg&s=19
इंटरनेट सेवा बंद
या जमावबंदीच्या कालावधीत परभणी शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच तेथील सर्व टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हे आदेश कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात काय म्हटले?
परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका इसमाने नुकसान केल्याने जमावाने शहरात तणाव निर्माण केला होता. त्यामुळे परभणी शहरात ताण-तणावाचे वातावरण तयार झाले आहे. लोक गटा-गटाने येऊन पुतळ्याच्या बाजूस येऊन घोषणाबाजी करीत आहेत. तसेच त्याबाबतचे व्हिडीओ प्रसारीत करीत आहेत. जिल्ह्यात कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असताना सुद्धा सदरील आदेशास न जुमानता आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील कालावधीत शहरात आणि जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून, परभणी शहर आणि जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लावण्यासंदर्भात परभणी पोलीस अधिक्षकांनी विनंती केली आहे. त्यानुसार, मी जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे परभणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करीत आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.