पुणे, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरातील पेरणे येथे 1 जानेवारी 2025 रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या नियोजन व सोयी सुविधांबाबतची माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी यंदा आठ ते दहा लाख अनुयायी येतील, असा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासनाने तयारी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
https://x.com/Info_Pune/status/1873730806247772373?t=7kb7ZKz2Cxte8Mj-uWs6yw&s=19
पीएमपीएमएलच्या बसेसची सोय
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 31 डिसेंबर रात्रीपासून ते 1 जानेवारी दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिक येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आणि त्या नागरिकांना विजयस्तंभापर्यंत ने-आण करण्यासाठी पीएमपीएमएल च्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणांच्या मदतीने त्याची पूर्णपणे तयारी केली आहे. असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना गाडी तळापासून ते विजयस्तंभ परिसरात ने-आण करण्यासाठी 31 डिसेंबर रात्री 575 बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच यासाठी 1 जानेवारी रोजी 1100 बसेस उपलब्ध असणार आहेत. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
वाहने पार्किंगची व्यवस्था
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायींची संख्या लक्षात घेऊन 45 ठिकाणी गाडी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 280 एकर एवढी जागा पार्किंगसाठी असणार आहे. याठिकाणी अनुयायींना त्यांची वाहने लावता येतील. वाहन पार्क केल्यानंतर अनुयायींना काही वेळातच पीएमपीएमएल च्या बसेसने विजयस्तंभ परिसरात नेण्यात येईल. या बसेस विजयस्तंभाच्या 400 ते 500 मीटर अलिकडे थांबतील. बसमधून उतरल्यानंतर हे अनुयायी विजयस्तंभाकडे पायी जातील आणि ते विजयस्तंभाला अभिवादन करतील. त्यानंतर ते पुन्हा या बसेस मध्ये बसून गाडी पार्किंगच्या ठिकाणी येतील, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
यासोबतच अनुयायींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य विषयक व्यवस्था, शौचालये यांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी 2400 शौचालये तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी साधारणतः 190 टँकर्स असणार आहेत. यासोबतच विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान पुणे शहर आणि ग्रामीण यांचे 10 हजार पोलीस कर्मचारी त्याठिकाणी तैनात असणार आहेत. तर एकूणच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायींना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडावा, त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे.