फाटक्या साड्या वाटपावरून विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र सरकारने राज्यातील अंत्योदय रेशनकार्ड असलेल्या महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 2023 ते 2028 या कालावधीत राबवली जाणार आहे. त्यानुसार, दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना रेशन दुकानावर या साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या साड्या फाटक्या व जुन्या असल्याचा आरोप काही ठिकाणच्या महिलांनी केला आहे. त्यावरून राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर या साड्यांचा व्हिडिओ शेयर करून एक ट्विट केले आहे. फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला ? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला? असे विजय वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हीच मोदींची गॅरंटी: वडेट्टीवार

“राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. 2023-2024 या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी 355 रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’ कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे.

जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा

सरकारने दिलेल्या या साडीची किंमत 120 रुपयांच्या वर नाही. तरी देखील सरकारी तिजोरीतून ही साडी 355 रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. अशा प्रकारची निकृष्ट प्रतीची साडी देऊन महाराष्ट्रातील महिलांचा अपमान महायुती सरकारने केला आहे. असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किटन किट वाटपाच्या नाराखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *