मुंबई, 19 जून: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात तात्काळ जातनिहाय जनगणना सुरू करून सर्व समाजाला न्याय द्यावा. तसेच यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी या पत्रातून केली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1803016078538219576?s=19
महायुती सरकारवर आरोप
राज्यात मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने झाली आहे. आताही आंदोलने सुरूच आहेत. त्यामुळे सरकारने हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडविला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला ठेच पोहचत आहे. मराठा, इतर मागास (ओबीसी), धनगर, आदिवासी, मुस्लिम, लिंगायत, अशा सर्व समाजाला महायुती सरकारने आरक्षणाची खोटी आश्वासने दिली. केवळ मतावर डोळा ठेवून महायुती सरकारने या सर्व समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे सध्या राज्यात अशांतता असून भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्यात गुण्या-गोविंदाने राहणारे हे सर्व समाज केवळ महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकमेकांविरोधात उभे राहत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी या पत्रातून केला आहे.
आरक्षणाबाबत फसवणूक
मराठा विरूद्ध ओबीसी, धनगर विरूद्ध आदिवासी असा संघर्ष राज्य सरकारने जाणीवपूर्वक उभा केला आहे. महायुती सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचा उद्योग केला आहे. 2014 नंतर भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने आरक्षणाबाबत दिलेली खोटी आश्वासने महायुती सरकारला पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे आज राज्यात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. काही भागात टोकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात तेढ निर्माण झाले आहे. जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. आज सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. ही परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांमुळे झाली आहे. मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी फसवणूक करण्याचं महापाप महायुती सरकारचं आहे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
सरकारने आरक्षणाचा प्रश्न चिघळवू नये
राज्यातील काही भागात काही गावांमध्ये दोन्ही समाजाने एकमेकांशी व्यवहार देखील बंद केल्याच्या घटना समोर येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. परंतु अशा ठिकाणी लोकांची दुभंगलेली मनं एकत्र आणण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यातील अशांतता कमी करून सर्व समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांची आरक्षणाची चिंता सरकारने दूर केली पाहिजे. केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सरकारने आरक्षणाचा प्रश्न चिघळवू नये. सत्तेसाठी काहीही करण्याचा इरादा सरकारने बदलावा. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यात जातनिहाय जनगणना करावी
आज राज्यातील संपूर्ण परिस्थिती पाहता जातनिहाय जनगणना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय सर्व समाजांच्या हक्कांचे संरक्षण होणार नाही. सरकार म्हणून ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात तात्काळ जातनिहाय जनगणना सुरू करून सर्व समाजाला न्याय द्यावा. याबाबत आपण केंद्राकडे पाठपुरावा करावा. तरच महाराष्ट्राचे पुरोगामित्व आबाधित राहिल. अन्यथा महायुतीच्या फसव्या कारभारामुळे राज्यातील सलोख्याचे वातावरण दुषित होईल. सध्या समाजा-समाजात आरक्षणाच्या प्रश्नामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने राज्यात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करून जातनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.