विजय शिवतारे यांची बारामती मतदार संघातून माघार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

बारामती, 28 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, विजय शिवतारे यांनी आता लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे. विजय शिवतारे यांची काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदार संघाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना यश आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विजय शिवतारे हे आज पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला समर्थन देणार असल्याची शक्यता आहे.

बारामतीत तिरंगी लढत टळली?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. तर लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना बारामती मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बारामती मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान शिवतारे यांच्या उमेदवारीचा फटका सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांनी काल मुंबईत विजय शिवतारे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. या बैठकीत बारामती मतदार संघाच्या उमेदवारीचा तोडगा निघाला असल्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यावर नाराजी

तत्पूर्वी, विजय शिवतारे हे पुरंदरचे माजी आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेंव्हापासून विजय शिवतारे हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीमुळे त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे हे बारामती मतदारसंघात स्वतःचा प्रचार करीत होते. मात्र, कालच्या बैठकीवरून विजय शिवतारे यांचे हे बंड थंड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर यासंदर्भातील घोषणा विजय शिवतारे हे लवकरच करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *