विजय शिवतारे 12 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार!

बारामती, 24 मार्च: शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. विजय शिवतारे यांनी येत्या 12 एप्रिल रोजी त्यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे, असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले. तर विजय शिवतारे यांच्या या घोषणेमुळे शिवसेना पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बारामतीमध्ये तिरंगी लढत?

या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशातच विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामती मतदार संघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बारामतीत दोन्ही पवारांना ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.

शिवतारे-पवार संघर्ष

तत्पूर्वी, विजय शिवतारे हे अजित पवारांचे विरोधक मानले जातात. विजय शिवतारे 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. 2014 मध्ये ते जलसंपदा राज्यमंत्री होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी विजय शिवतारे यांना आव्हान दिले होते. तुम्ही आमदार कसे होतात? तेच मी पण बघतो, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. 2019 च्या निवडणूकीत विजय शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभव केला होता. तेंव्हापासून विजय शिवतारे हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता बारामती मतदार संघातून पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *