पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा विजय

पुरंदर, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी विजय मिळवला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पहायला मिळाली. यामध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, काँग्रेस पक्षाचे संजय जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे यांच्यात सामना होता. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या निवडणुकीत विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी विजय मिळवला आहे.

पुरंदरमध्ये तिरंगी लढत

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विजय शिवतारे ही प्रतिष्ठेची बनली होती. विजय शिवतारे यांच्यासमोर एकीकडे काँग्रेसचे संजय जगताप यांचे आव्हान असताना त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने पुरंदर विधानसभा मतदारसंघात संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा परिस्थितीत विजय शिवतारे यांनी विजय मिळवल्यामुळे पुरंदरमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला नवी उभारी मिळाली आहे.

कोणाला किती मतदान?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा 24 हजार 188 मतांनी विजय झाला आहे. यामध्ये विजय शिवतारे यांना 1 लाख 25 हजार 819 इतकी मते मिळाली. तसेच काँग्रेसच्या संजय जगताप यांना 1 लाख 01 हजार 631 इतकी मते मिळाली. तर संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 इतकी मते मिळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *