अकोला, 05 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. वसंत मोरे यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन निवासस्थानी पक्षप्रवेश केला. त्यावेळी, प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला. याप्रसंगी, त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी देखील वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. यावेळी वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेत ‘वंचित’चा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
https://twitter.com/VBAforIndia/status/1776287024833790445?s=19
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा
दरम्यान, वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही. त्यावेळी काँग्रेसने पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. तरी देखील वसंत मोरे हे पुणे मतदार संघातून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे वसंत मोरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशातच वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
पुण्यात यंदा तिरंगी लढत!
वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे पुण्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लोकसभेत पुणे मतदार संघात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.