नाराजीच्या चर्चांवर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?

मुंबई, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील 48 जागांचा फॉर्मुला जाहीर केला. यामध्ये मुंबईतील 6 पैकी 4 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतील 2 जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे मुंबईतील नेते नाराज झाले आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. या पार्श्वभूमीवर, वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपात काँग्रेसला मुंबईतील 3 जागा मिळायला पाहिजे होत्या, असे मत व्यक्त केले.

मुंबईत काँग्रेस संघटना आजही मजबूत

प्रत्येक पक्ष संघटनेला आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटत असतं की, आपल्या पक्षाला निवडणुकीच्या जागावाटपात योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यात चुकीचं काही नाही, असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे. मुंबईत काँग्रेस संघटना आजही मजबूत आहे. लोकसभेच्या जागांसंदर्भात आम्हाला बरोबरीच्या जागा मिळाव्यात, यासाठी आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मी पक्षश्रेष्ठींसमोर आणि आघाडीच्या ज्या-ज्या बैठकीत उपस्थित होते, तिथे आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.

काहीही म्हणणं असेल तर श्रेष्ठींना कळवू

पण एकदा पक्षश्रेष्ठींनी एखादी भूमिका घेतली तर, त्या भूमिकेशी पक्षाशी आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकरूप राहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. येत्या काळात मुंबई काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला निवडणुकीच्या कामाला लागलेला दिसेल. आमचं काहीही म्हणणं असेल तर आम्ही आमच्या श्रेष्ठींना कळवू, अशा वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. तसेच लोकशाही आणि पर्यायाने देश वाचवणे, संविधानाचे रक्षण करणे हे आमच्या आघाडीचे ध्येय आहे. मोदींची हुकूमशाही, अन्यायकारी राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य पुनःस्थापित करणे आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही तो गाठू, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *