मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी 16 हजार 514 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. दरम्यान, मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये उज्ज्वल निकम हे हजारो मतांच्या फरकाने आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वर्षा गायकवाड यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेत उज्ज्वल निकम यांच्यावर विजय मिळवला. तत्पूर्वी, पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मुंबई उत्तर मध्य हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1797966220588614077?s=19
कोणाला किती मतदान झाले?
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना एकूण 4 लाख 45 हजार 545 इतकी मते मिळाली. या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांच्या बाजूने इतर उमेदवारांच्या तुलनेत 48.93 टक्के मतदान झाले. तर उज्ज्वल निकम यांना एकूण 4 लाख 29 हजार 031 इतकी मते मिळाली. तसेच या निवडणुकीत त्यांना 47.12 टक्के इतके मतदान झाले. दरम्यान उत्तर मध्य मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष अंबुलगे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना या निवडणुकीत एकूण 8 हजार 288 इतके मतदान झाले. याशिवाय ह्या मतदारसंघात नोटाला एकूण 9 हजार 749 मते पडली. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.