बारामती, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांनी हे कार्यक्रम घेतले आहेत. या कार्यक्रमांतर्गत दि. 21 आणि 22 डिसेंबर रोजी सकाळी बारामती शहरातील कसबा परिसरातील आण्णाभाऊ साठे चौक याठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप कॅम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यात आले आहे.
याशिवाय, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील मुकबधीर शाळेत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बारामती शहरातील कसबा येथील शाळा क्र. 2 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बारामती शहरातील पंचशिलनगर, समाजमंदीर आणि कसबा याठिकाणी सत्कार व केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना बारामती तालुका व शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.