माळेगाव, 20 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव येथे सध्या कृषिक 2024 हे प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी भरविण्यात आले आहे. जागतिक दर्जाच्या या कृषी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस आहे. या कृषी प्रदर्शनाला आज विविध मान्यवरांनी भेट दिली. त्याचबरोबर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसह आज तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू या राज्यांतील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
या कृषी प्रदर्शनात 150 पेक्षा जास्त स्टॉल
आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांत कुमार पाटील तसेच राज्याचे फलोत्पादन संचालक मा. श्री कैलास मोते यांनी या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नाबार्ड तसेच काही खाजगी कंपन्या यांच्या सहकार्यातून होत आहे. या प्रदर्शनामध्ये 150 पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल आहेत. भाजीपाला पिकांबाबत असलेले नवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर फुल शेतीमध्ये आलेले विविध नवीन वाण व लागवड पद्धती, त्याचे नियोजन याबाबतची माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जाणवला.
या दिवशी अश्वप्रदर्शनाचे आयोजन
ऊस पिकांमधील असलेल्या विविध प्रजाती व त्याची लागवड पद्धती त्यासाठी वापरलेले ठिबकचे तंत्रज्ञान व खत पद्धती, चायनीज पद्धतीने केलेली मका लागवड, पांढरा झेंडू, भाजीपाल्याचे विविध प्रकार याची माहिती शेतकरी उत्सुकतेने घेताना दिसले. कमी खर्चातील शेती मशागत औजारे, औषध फवारणी औजारे याची देखील माहिती शेतकरी घेत होते. या प्रदर्शनामध्ये उद्या 20 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान डॉक्टर आप्पासाहेब पवार अश्वप्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये मारवारी आणि भीमथडी देखणे दिमागदार उत्तम प्रतीचे अश्व प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
तसेच या ठिकाणी दररोज होलस्टेन फ्रिजियन गाईचे दूध उत्पादन स्पर्धा ही आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी आपल्या गाय सह सहभागी होत आहेत. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे विविध उत्पादने, जीवाणू खते, बायोप्रोम व औषधे, फळ व भाजीपाला रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सिद्ध वळूची वीर्य मात्रा आणि दर्जेदार गाभण कालवडी खरेदीसाठी संधी आहे. आजच्या प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांचे गर्दी पाहता उद्या आणि परवा ही या प्रदर्शनाचे नियोजन योग्य रीतीने व्हावे यासाठी ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र दादा पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे हे सर्वत्र स्वतः जातीने लक्ष देऊन काही त्रुटी राहू नये म्हणून योग्य सूचना देत आहेत.
‘कृषिक’ बाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान, या कृषी प्रदर्शनाच्या संदर्भात काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे हे पाचवे वर्ष पहाण्याचे आहे. सर्व नियोजन उत्तम झाले आहे. मला व्हाट्सअप वरती मेसेज आला होता. या ठिकाणी फुले आणि भाजीपाला पिकांमध्ये जे तंत्रज्ञान वापरले आहे ते मला अतिशय आवडले व ते मी माझ्या शेतात करणार आहे,” असे परभणी जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पंडित थोरात या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, “मी यापूर्वी दोन वेळा हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलो होतो. यावर्षी मला मत्स्य शेतीची माहिती आवडली,” असे मत बेळगाव जिल्ह्यातील सुभाष मोदगे यांनी म्हटले आहे. तर, “मला फेसबुक वरून या प्रदर्शनाची माहिती मिळाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमधील वापर यावर आधारित प्लॉट आवडले.” असे धाराशिव येथील नेताजी शिंदे यांनी म्हटले आहे.