सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांतीचे तिघेजण ताब्यात

परळ, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.26) सकाळच्या सुमारास घडली. सदावर्ते यांच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असलेल्या घराबाहेर त्यांच्या गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी या तिघांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत त्यांच्या या गाड्यांची तोडफोड केली आणि ते फरार झाले. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे तिघे संभाजीनगरचे असून ते मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

तत्पूर्वी, गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला वेळोवेळी विरोध केला होता. यासंदर्भात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली होती. यासोबतच त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या सभेला देखील विरोध केला होता. हाच राग मनात धरून मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या

दरम्यान, या तोडफोडीच्या घटनेनंतर वकील गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जोपर्यंत अंगात रक्त धावत आहे, तोपर्यंत खुल्या वर्गासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आपण ‘जय श्री राम’ आणि ‘वंदे मातरम’ म्हणतो. आज माझ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. माझी हत्याही होऊ शकते. माझ्या कुटुंबाला ही धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझी मुलगी शाळेत जात नाही. यासोबतच माझ्या पत्नीला उचलून नेण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. पण मी मागे हटणार नाही. मी घाबरणार नाही. असे ते म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करावी.” अशी मागणी ही सदावर्ते यांनी यावेळी केली. मला हल्लेखोरांना आणि मनोज जरांगे यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. हिच का तुमची शांततापूर्ण आंदोलनाची व्याख्या? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. तर या तोडफोडीच्या घटनेमुळे येत्या काही काळात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

One Comment on “सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांतीचे तिघेजण ताब्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *