सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केल्याने वंचित बहुजन आघाडीची नाराजी

मुंबई, 11 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. यासाठी महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडून सध्या अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणार अशी अपेक्षा केली जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने बारामती आणि मुंबईतील उमेदवारीवरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

वंचित बहुजन आघाडीची उघड नाराजी

तत्पूर्वी, शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही, तरी देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने काय म्हटले?

महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहे. प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? काल सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत? तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात. पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा. आम्हाला आशा आहे की, वरील मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल. आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *