उत्तराखंड हिमस्खलन; 42 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू

चमोली (उत्तराखंड), 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामजवळील माणा गाव परिसरात आज (दि.28) सकाळी हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे 57 कामगार बर्फाखाली अडकले होते. यापैकी 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर 42 जणांचा अजूनही शोध लागलेला नाही, अशी माहिती एसडीआरएफच्या पोलीस महानिरीक्षक रिधिमा अग्रवाल यांनी दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1895396294832824722?t=Og0MX0AhCqsvVPAEn1VxKw&s=19

खराब हवामानाचा बचावकार्यात अडथळा

हिमस्खलनानंतर एसडीआरएफची एक टीम जोशीमठहून घटनास्थळी रवाना झाली आहे. मात्र, लामबगड येथे रस्ता बंद असल्याने लष्कराच्या मदतीने मार्ग खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरे पथक हेलिपॅडवर सतर्क ठेवण्यात आले आहे. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. परंतु, खराब हवामानामुळे बचावकार्य करण्यास अडचण निर्माण होत आहे. प्रतिकूल हवामानाची आव्हाने असूनही, उर्वरित अडकलेल्या कामगारांना शोधून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान सुधारताच एसडीआरएफची विशेष हाय-एल्टीट्यूड रेस्क्यू टीम हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य सुरू करणार आहे. ड्रोनद्वारे परिस्थिती पाहण्याची तयारी एसडीआरएफने केली असली, तरी सततच्या बर्फवृष्टीमुळे सध्या हे शक्य झालेले नाही. असे उत्तराखंड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

https://x.com/AHindinews/status/1895428063841943987?t=I9fQPRyxpmJxBWLveHa3pg&s=19

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

चमोली हिमस्खलन बचाव मोहिमेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बीआरओच्या रस्ता बांधकामाच्या जवळ हिमस्खलन झाले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. आयटीबीपी, सैन्य, स्थानिक प्रशासन आणि हवाई दल यांच्याशी बोलणी झाली आहे. सगळे बचाव कार्यात गुंतले आहेत. सध्या हवामान खराब आहे. दृश्यमानता खूप कमी असल्यामुळे हेलिकॉप्टर सेवा देता येत नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफ कार्यरत आहेत. आम्ही इथून सतत लक्ष ठेवून आहोत. आमचा प्रयत्न आहे की अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता यावे.” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, बेपत्ता कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *