दिल्ली, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) ने ऑक्टोबर 2024 मध्ये एकाच महिन्यात सुमारे 16.58 अब्ज आर्थिक व्यवहार करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. युपीआय ने यावर्षी ऑक्टोबरमध्ये 16.58 अब्ज आर्थिक व्यवहार केले, त्याची किंमत अंदाजे 23.49 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत युपीआय वरील व्यवहारांत 45 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. युपीआयने ऑक्टोबरमध्ये 16.58 अब्ज व्यवहार नोंदविले गेले. या आकडेवारीत 2023 च्या तुलनेत 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोंबर 2023 मध्ये 11.40 अब्ज व्यवहार झाले होते.
व्यवहार करणे सुलभ झाले
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने 2016 मध्ये युपीआय प्रणाली लॉन्च केली होती. या प्रणालीच्या माध्यमातून अनेक बँक खाती एकाच मोबाईलच्या ऍप्लिकेशनमध्ये एकत्रित करून देशाच्या पेमेंट इकोसिस्टममध्ये क्रांती घडवून आणली गेली. त्यामुळे एकाच ठिकाणावरून ॲपच्या माध्यमातून पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी करणे आणि क्यूआर कोड स्कॅनिंग करून व्यवहार करणे हे अत्यंत सोयीस्कर झाले. तसेच यामधून पीअर-टू-पीअर करून व्यवहार करणे देखील सक्षम झाले आहे, असे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
युपीआय ने केवळ आर्थिक व्यवहार जलद, सुरक्षित आणि सहज केले नाहीत, तर त्याने अनेक व्यक्ती, छोटे व्यवसाय आणि व्यापारी यांना सक्षम बनवले आहे, ज्यामुळे देशाची कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीला आंतरराष्ट्रीय गती मिळत आहे. ज्यात यूएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या प्रमुख देशांच्या बाजारपेठांचा समावेश आहे.