पुणे, 27 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. यामध्ये, हिंगोली, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, नांदेड या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे हाता तोंडाला आलेली पिके भुईसपाट झाली आहेत.
पवारांवरील आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर; नितेश राणेंचा तो फोटो शेयर
नाशिक जिल्ह्यात काल दुपारपासून आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानकपणे हा पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि निफाड या तालुक्यांत जोरदार गारपीट झाली. त्यामुळे तेथील द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. या पावसामुळे तेथील ज्वारी, कापूस, केळी आणि भात यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे वीज कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तेथील कापूस आणि तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे एक-दोन दिवसांत काढणीला आलेला कापूस भिजून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात देखील काल गारपीट झाली. या पावसामुळे वावरात उभी असलेली ज्वारी भुईसपाट झाली आहे. या पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसत होते. तसेच शिरूर तालुक्यात ही काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळे येथील गहू, ज्वारी, मका, कांदा, बटाटा, डाळिंब यांसारख्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात देखील काल जोरदार गारपीट झाली. यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तेथील फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. तर नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर आज देखील असाच कायम राहणार, असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला केला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
One Comment on “अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान”