कोल्हापूर, 8 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानूसार राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये द्राक्ष , डाळिंब यांसह भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परंतू काही ठिकाणी हा पाऊस रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आधीच यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रब्बीतील पिकांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आहे. आता अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी अधिकच कोंडीत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाही, त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीके काढणीला वेग देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत अंडी आणि केळी मिळणार!
सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये कराड आणि पाटण तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे येथील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या पावसामुळे तेथील रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर सांगली जिल्ह्यात देखील आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, अंकलखोप, जत, उमदी यांसारख्या अनेक गावांत अवकाळी पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. याचा सर्वात जास्त फटका द्राक्ष पिकांना बसणार आहे. अशा वातावरणामुळे द्राक्षांच्या बागांवर रोग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांत देखील आज पहाटेपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे भाताच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीत व्यत्यय येणार आहे. दुसरीकडे, रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा व इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. तर या पावसामुळे या ठिकाणच्या हवेतील गारवा वाढला आहे.
श्री काळभैरवनाथ ग्रामसमृद्धी पॅनल चा दणदणीत विजय
यावेळी रत्नागिरी जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा यांसारख्या अनेक गावांत मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ऐन कापणीला आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील हलका पाऊस पडेल, असे ही हवामान विभागाने म्हटले आहे.
One Comment on “राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान”