पुणे, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट आले आहे. येत्या 24 तासांत राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचबरोबर धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांसह राज्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. या पावसामुळे आंबा, काजू यांसारख्या अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1744568156964966781?s=19
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1744258811865825567?s=19
सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्यात पाऊस
आज सकाळपासूनच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि दक्षिण कोकणातील बहुतांश भागात आकाश अंशतः ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी, गेल्या एक-दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर, देवगड, कुडाळ आणि सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा याठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे याचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसू शकतो. या अवकाळी पावसामुळे शेती पिके आणि फळबागांवर रोगराई पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1744626408314589513?s=19
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1744569350810472455?s=19
पुणे जिल्ह्यात रिमझिम पाऊस
याशिवाय, पुणे शहरासह जिल्ह्यातील बारामती, इंदापूर सह अनेक जिल्ह्यांत आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. सध्या पुणे शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच येत्या 24 तासांत पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या पावसाच्या वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील हवेमध्ये गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे बदललेल्या या वातावरणामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.