केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

हाथरस, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यासोबतच त्यांनी जखमींचीही भेट घेतली.

https://x.com/RamdasAthawale/status/1810641729822835145?s=19

https://x.com/RamdasAthawale/status/1810643096100548620?s=19

मृतांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, रामदास आठवलेंची मागणी

हाथरस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आयोजक बाबांनी आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आमची मागणी आहे की, राज्य सरकारने हातरस दुर्घटनेतील 121 मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, असे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, रामदास आठवले यांनी आज हाथरस येथील नवीपूर गावात जाऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळावी, अशी आरपीआयची मागणी आहे. असे रामदास आठवले यांनी यावेळी म्हटले आहे.

आतापर्यंत 7 जणांना अटक

दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रदेशातील हाथरसमध्ये 2 जुलै रोजी सूरजपाल उर्फ भोले बाबा याच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 121 लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. तो या सत्संगाच्या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक होता. त्याच्याशिवाय याप्रकरणात आणखी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सूरजपाल उर्फ भोले बाबा हा फरार झाला आहे. त्याचा सध्या उत्तर प्रदेश पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *