केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवलीच पाहिजे – शरद पवार

चांदवड, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ लाभली. या आंदोलनात शरद पवार हे स्वतः सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात हल्लाबोल केला.



“नाशिक जिल्हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत त्या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही”, असे शरद पवार म्हणाले आहेत. “केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशात कांद्याचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. अशी आंदोलने करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, मात्र जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही, तोपर्यंत सरकार तुमच्या प्रश्नांची दखल घेणार नाही”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

“आपण कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव पडू देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले होते, परंतु सध्याचे सरकार ते करू शकलेले नाही,” याची आठवण शरद पवार यांनी यावेळी करून दिली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आपण आज चांदवडमध्ये आंदोलन करणार असल्याचे माहीत झाल्यावर, आज सकाळपासून राज्य सरकारमधील नेते आम्ही यासंदर्भात केंद्र सरकारसोबत बोलू असे म्हणताना दिसत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

“केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. ज्याचा बाजारातील किमतींवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवलीच पाहिजे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीत हस्तक्षेप करू नये. आजच्या आंदोलनामुळे केंद्राचे डोळे उघडतील आणि त्यांना निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले जाईल,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *