नवी मुंबई, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) नवी मुंबईतील उलवे परिसरातील जावळे गावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका किराणा मालाच्या दुकानाला आणि घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.30) रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एक महिला आणि दोन मुलांसह एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. रमेश असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो या दुकानाचा मालक आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवाळीच्या सणामध्येच ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
https://x.com/ANI/status/1851677657680998462?t=ySyURJ08F8EB7Wvq51kSdQ&s=19
अग्निशमन दलाने ही आग विझविली
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन गाड्यांच्या मदतीने ही आग विझविली. त्यावेळी जखमी व्यक्तीला स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केले. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. परंतु, अद्याप याचे कारण समजू शकलेले नाही. अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी दिली माहिती
“एका व्यक्तीच्या घराला आणि किराणा दुकानाला आग लागल्याची माहिती आम्हाला 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास मिळाली. त्यावेळी या किराणा मालाच्या दुकानात तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे या दुकानाला आणि घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन 5 किलो वजनाचे दोन लहान सिलिंडर आणि एका घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत जखमी दुकानदार रमेश याची पत्नी मंजू आणि त्याच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या जखमी दुकानदारावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जखमी झालेला हा दुकानदार राजस्थानचा रहिवासी असून, तो आपल्या कुटुंबासह नवी मुंबईतील उलवे परिसरातील जावळे गावात राहत होता.