सांगोला, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहुद परिसरातील बंडगरवाडी येथे भरधाव वेगात असलेल्या एका आयशरने 8 महिलांना धडक दिल्याची घटना घडली आहे. आज दुपारी 4.15 वाजता हा अपघात झाला. या अपघातात 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत या अपघातातील मृतांची संख्या 7 वर गेली आहे. तर एका जखमी महिलेवर पंढरपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व महिला मजूर होत्या
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर याठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सर्व महिला मजुरीचे काम करीत होत्या. त्या सर्वजणी कटफळ येथील रहिवासी होत्या. या महिला कामावरून सुटल्यानंतर चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी या महिलांना कोळसा वाहतूक करणाऱ्या एका आयशरने समोरून येऊन जोरदार धडक दिली.
एकजण पोलिसांच्या ताब्यात
या अपघातात पाच महिला मृत्युमुखी पडल्या. तर तीन जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 2 महिलांचा उपचारावेळी मृत्यू झाला. या अपघात झालेल्या आयशर मध्ये दोघेजण होते. ह्या अपघातानंतर त्यातील एक जण फरार झाला आहे. तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तर या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.