बारामती, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारामती-फलटण रोड रुंदीकरणाचे सध्या काम सुरू आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बारामती शहरातील ढवाण पाटील चौक येथील रस्त्यालगत असलेले एक मोठे लिंबाचे झाड तोडले जात आहे. हे झाड तोडण्यासाठी संबंधित ठेकेदाराने वन विभागाची किंवा बारामती नगर परिषदेची परवानगी घेतली नाही. देखील अशा प्रकारच्या वृक्षांची हत्या ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तरी देखील प्रशासन गप्प का आहे? असा सवाल बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात सामजिक कार्यकर्ते चैतन्य गालिंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. बारामती-फलटण रोड रुंदीकरणाच्या नावाखाली बारामती शहरातील ढवाण पाटील चौक येथील रस्त्यालगत असलेले लिंबाचे झाड जे मानवाला जगण्यासाठी 24 तास ऑक्सिजन देत आहे, अशा झाडाची निर्घृण अशी हत्या केली जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून हे झाड विनापरवानगी तोडण्यात येत आहे. तरी देखील प्रशासन का गप्प आहे? याप्रकरणी काय कारवाई होईल की नाही? किंवा बारामतीकरांना नैसर्गिक ऑक्सिजन देणारे हे झाड जगविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल का? असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
चौकशी करण्याची मागणी
अशा प्रकारे झाडे तोडण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? तसेच त्यासाठी कोणत्या वन संरक्षण अधिनियमाअंतर्गत परवानगी दिली? आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने निष्पाप या वृक्षाची हत्या केली जात आहे? याची सखोल चौकशी व्हावी आणि या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी चैतन्य गालिंदे यांनी केली आहे.