ठाणे, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) कल्याणमधील शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड आणि राहुल पाटील दोघे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली आहे.
https://twitter.com/ANI/status/1753711787076395308?s=19
मुख्यमंत्र्यांनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ह्या गोळीबाराच्या घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली. तसेच त्यांनी यावेळी महेश गायकवाड यांच्या प्रकृती संदर्भात ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान, महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे कार्यकर्ते प्रार्थना करीत आहेत.
गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ
तत्पूर्वी, या गोळीबाराच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली. यासंदर्भात आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांना उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानूसार, ते दोघे काल रात्री या पोलीस ठाण्यात हजर झाले. तर महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे पोलीस ठाण्यात शांतपणे बसले असताना गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावर अचानकपणे गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली. या गोळीबाराच्या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली होती.