दिल्ली, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) UGC-NET परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्राध्यापक पात्रतेसाठी आवश्यक असलेली UGC-NET 2024 ची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या परीक्षेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असून, त्याच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच याचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक केंद्र सरकारने प्रसिद्ध केले आहे.
https://x.com/EduMinOfIndia/status/1803470271208124784?s=19
24 तासांतच नेट परीक्षा रद्द
विशेष म्हणजे, UGC-NET परीक्षा 18 जून रोजीच घेण्यात आली होती. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली होती. मात्र या परीक्षेतील गैरप्रकारांसदर्भात भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सीबीआयच्या तपासानंतरच या परीक्षेत घोटाळा झाला आहे की नाही? याचे उत्तर मिळणार आहे.
NEET(UG) 2024 परीक्षा संदर्भात
तत्पूर्वी, NEET 2024 परीक्षा संदर्भात देशात वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशातच UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “NEET (UG) परीक्षा-2024 शी संबंधित प्रकरणातील ग्रेस गुणांची समस्या आधीच पूर्णपणे सोडवली गेली आहे. पाटणा येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल.” या परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रकरणामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा संस्था गुंतल्याची आढळल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा पुनरुच्चार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केला आहे.