मुंबई, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 13 मतदारसंघात काल मतदान पार पडले. यामध्ये मुंबईतील 6 जागेंचा समावेश आहे. मात्र मुंबईत काल संथगतीने मतदान पार पडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मतदान केंद्रावर मतदार मोठ्या संख्येने जात असल्याचे मी पाहिले आहे, परंतु गैरसोयीमुळे त्यांना परत जावे लागले. मतदारांना मतदान करता येऊ नये, म्हणून आतमध्ये बराच वेळ घेतला जात आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की, वेळ लागला तरी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1792539553921933429?s=19
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मतदान कमी होण्यामागे प्रशासन कारणीभूत आहे. जिथे आमची आघाडी आहे, तिथे मशिनची व्यवस्थित व्यवस्था नाही. मशिन्स बंद आहेत. हे मोदी सरकारचे नाटक आहे. त्यांना पराभवाची भीती आहे. लोक उत्साहित आहेत. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. निवडणूक आयोगाने खेळलेला हा खेळ आहे. जिथे आमची टक्केवारी जास्त असणार आहे तिथे मतदान कमी होत आहे. निवडणूक आयोग पक्षपाती आहे. ठराविक समुदायांमध्ये वारंवार ओळखपत्रांची मागणी केली जात आहे. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो की, रांगेत उभे राहा आणि मतदान करा, पहाटे पाच जरी वाजले तरी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना सोडू नका आणि तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1792522122117755362?s=19
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरू केले असून, पराभव समोर स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांनी मोदींवर आरोप केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. “मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका,” असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.