सातारा मतदार संघातून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर!

सातारा, 16 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज सातारा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून आज त्यांच्या आणखी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपने 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 543 जागांसाठी आतापर्यंत सुमारे 430 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे दिली आहेत. यामध्ये उदयनराजे भोसले यांना आज साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1780112420830052763?s=19

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार

यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून लढताना विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.

शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले

या पराभवानंतर उदयनराजे भोसले यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. तरी देखील सातारा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता. या निवडणुकीत सातारा मतदार संघातून लढण्यासाठी उदयनराजे भोसले हे इच्छुक होते. त्यासाठी उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. तरी देखील उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाजपने आज अखेर सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे साताऱ्यात आता उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. दरम्यान, ही लढत देखील काटे की टक्कर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *