बदलापूर, 20 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा या शाळेत कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करीत होता. त्याने बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार केले आहेत. यातील एका मुलीने आपल्या पालकांना त्रास होत असल्याचे सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलींच्या पालकांनी सोमवारी रात्री आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
https://x.com/ANI/status/1825783176708419776?s=19
https://x.com/ANI/status/1825797660671881692?s=19
आंदोलकांकडून रेल्वे रोको
दरम्यान, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बदलापूर येथील मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंदोलकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले जात आहे. त्यामुळे जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी याठिकाणी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1825800204668326382?s=19
आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
https://x.com/CMOMaharashtra/status/1825804623120068875?s=19
मुख्यमंत्री काय म्हणाले?
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय करण्यास त्यांनी सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आले पाहिजे, अशी यंत्रणा हवी. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
https://x.com/Devendra_Office/status/1825802582041756122?s=19
एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथील या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी यावेळी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.