बेंगळुरू, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्वल रेवन्नाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात दोघांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कर्नाटक पोलिसांच्या एसआयटी तपास पथकाने केली आहे. नवीन गौडा आणि चेतन कुमार अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्या सुनावणीसाठी हे दोन आरोपी आज न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एसआयटी पथकाने या दोन आरोपींना अटक केली.
https://twitter.com/ANI/status/1795692505306218931?s=19
दोघे अटकेत
अटक करण्यात आलेले चेतन गौडा आणि नवीन गौडा या दोघांनी कथितरित्या माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याचे पेन ड्राइव्ह मधील अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा करण्यासाठी कर्नाटक राज्य महिला आयोगाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने 28 एप्रिल रोजी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयटीकडे सोपवली होती.
https://twitter.com/ANI/status/1795047355751817571?s=19
प्रज्वल रेवन्ना प्रकरण
दरम्यान, जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर महिलांचे शोषण करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात एक पेन ड्राइव्हही चर्चेत आला आहे. ज्यामध्ये प्रज्वलचे शेकडो अश्लील व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना 27 एप्रिल रोजी परदेशात पळून गेला होता. तर प्रज्वल रेवन्ना याने सोमवारी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तो 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटी तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर होईल. त्यामुळे या प्रकरणात प्रज्वल रेवन्नावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.