24 लाखांच्या ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

पुणे, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी ऑनलाईन बँकिंग फसवणुकीप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एका 64 वर्षीय व्यक्तीचे बँक खाते वापरून वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींच्या खात्यांवर 24.48 लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादंवि कलम 318 (4), 3(5) व आयटी ॲक्ट 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणात पोलिसांनी इफ्तीकार रहिमखान पठाण (वय 31, रा. गोवंडी, मुंबई) आणि मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (वय 52, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांना अटक केली आहे. या आरोपींनी एकूण 24 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयाने 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत. दरम्यान, या फसवणुकीची एकूण रक्कम 24.48 लाख रुपये असून, ती आरोपींनी वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली आहे. सदर रक्कम परत मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

तत्पूर्वी, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. पोलिसांनी चौकशीत फिर्यादी यांच्या वडिलांबाबत माहिती घेतली असता, ते कुटुंबापासून वेगळे राहात होते आणि त्यांच्या दैनंदिन कामांसाठी इमारतीतील वॉचमन हनीफ नावाचा इसम मदत करत असल्याचे समोर आले. बँकेकडून ट्रान्झॅक्शनची पडताळणी केली असता संबंधित रक्कम इफ्तीकार खान आणि नूर जहाँ यांच्या बँक खात्यांवर वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांना तपासात यश

दरम्यान, वॉचमन हनीफ हा घटनेनंतर फरार झाला होता आणि त्याचा मोबाइलही बंद होता. तांत्रिक तपासात हनीफ व इफ्तीकार खान एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. संशयितांविषयी महत्त्वाची माहिती गोळा करून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अगोल दणके, गायत्री पवार यांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी येथे जाऊन तपास केला.

आरोपींना अटक

त्यामध्ये पोलिसांनी आरोपी इफ्तीकार पठाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हनीफबाबत माहिती दिली, त्यानुसार हनीफ हा सध्या पुण्यातील हांडेवाडी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस अंमलदार अविनाश गोसावी आणि कुंडलिक केसकर यांनी त्याठिकाणी जाऊन दुसरा आरोपी मोहम्मद हनीफ अफसर याला ताब्यात घेतले.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

त्यानंतर आरोपींनी पोलीस तपासात फसवणूक केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांनी मोहम्मद हनीफ आणि इफ्तीकार पठाण हे नात्याने मेव्हणे असल्याचे देखील पोलिसांना सांगितले. दरम्यान, हनीफ हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असताना फिर्यादीच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांच्या एकटे राहण्याबाबतची माहिती हनीफने इफ्तीकार पठाणला दिली. दोघांनी संगनमत करून फिर्यादीच्या वडिलांना व्यसनाच्या आहारी लावले व त्यांचा मोबाइल व बँकिंग अ‍ॅक्सेस मिळवून वेळोवेळी पैसे स्वतःच्या व नातेवाईकांच्या खात्यांवर वळवले. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *