मुंबई, 21 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मायक्रोब्लॉगिंग साईट ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) मध्ये आज सकाळी 11 वाजल्यापासून तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे जगभरातील ट्विटर वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ट्विटर अचानकपणे डाऊन झाल्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारची पोस्ट करता येत नव्हती. तसेच फिड मधील पोस्ट आणि मेसेज ही दिसत नव्हते. त्यामुळे ट्विटर वापरकर्ते चांगलेच हैराण झाले होते. त्यावेळी ‘ट्विटर डाऊन’ हा हॅशटॅग ट्रेंड करीत होता. मात्र, ट्विटरची सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे.
यावेळी लोकांना ‘एक्स’ (ट्विटर) ॲप उघडताच “तुमच्या टाइमलाइनवर आपले स्वागत आहे” असा स्क्रीनवर मेसेज दिसत होता. त्यामुळे जगभरातील ट्विटर सेवा सध्या ठप्प झाली होती. जगभरातील बहुतांश ट्विटर वापरकर्त्यांना आज सकाळपासून या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, तासाभराहून अधिक काळ खंडित झाल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे.
दरम्यान, ‘एक्स’ (ट्विटर) सेवा डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा ट्विटर सेवा डाऊन झालेली आहे. या वर्षी मार्च आणि जुलैमध्ये ट्विटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मार्च महिन्यात ट्विटर सेवा काही तास ठप्प झाली होती. तत्पूर्वी, एलोन मस्कने ट्विटर ॲप खरेदी केल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत. मस्कने ट्विटरचे नाव बदलून ‘एक्स’ असे केले आहे. सोबतच त्याचा लोगो देखील बदलला आहे.