बारामती, 01 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन 2023-2024 ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी पार पडली. ही सभा बाजार समितीच्या मुख्य आवारात माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन 2004 पासून कृषि उत्पन्न बाजार समित्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत सरकारकडून निर्देश आले होते, तेंव्हापासून ही आजची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती.
बारामती बाजार समितीच्या विकास व विस्तारामध्ये तालुक्याचे आमदार म्हणुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खुप मोठे योगदान आहे, असे मत बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले. तसेच बारामती बाजार समितीमध्ये राबविलेले विविध उपक्रम व शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेसाठी आवारात असलेल्या सोई-सुविधा यामुळे राज्यातील 306 बाजार समित्यांमध्ये बारामती बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला यांचे सर्व श्रेय समितीचे सभापती व संचालक मंडळ, सचिव व माजी संचालक मंडळ तसेच सेवक यांना जात असल्याचे मदन नाना देवकाते यांनी सांगितले.
यावेळी सभापती सुनिल पवार यांनी बारामती बाजार समितीने सन 1935 च्या स्थापनेपासून समितीची वाटचाल व विकास आणि पुरविलेल्या सोई-सुविधा तसेच उपक्रम आणि समितीची झालेली उलाढाल व उत्पादनात झालेली वाढ यांच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा प्रास्ताविकात मांडला. तसेच समितीने सुपे येथे शासकीय 7 हेक्टर 03 क्षेत्र खरेदी केली आहे. त्याठिकाणी नवीन उपबाजार आवार विकसित करीत असून तेथे व्यापारी गाळे, सेलहॉल, कर्मशिअल गाळे, दोन टॉयलेट ब्लॉक या कामांची सुरूवात लवकर करीत आहोत. तसेच झारगडवाडी येथील शासकीय गायरान 21 एकर क्षेत्र उपबाजार आवाराकरीता समितीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे विनामुल्य मिळाले असून, त्याठिकाणी ही समिती उपबाजार विकसित करणार आहे. त्यामुळे सभेत अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
मुख्य आवारात रेशीम कोष खरेदी विक्री प्रकल्प इमारती साठी सरकारकडून 17.5 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून सदर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तसेच जळोची उपबाजार येथे ऑफीस इमारत व 16 गाळे आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचे बांधकाम पुर्ण झाले आहे. या सर्व सुविधेमुळे बारामती बाजार समितीचा नावलौकीक वाढत चालला आहे. भविष्यात देखील आणखी उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे.
एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने समिती तर्फे उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या शेतकरी, आडतदार, खरेदीदार, हमाल, मापाडी आणि सेवक यांचा सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मुख्य यार्ड मधील व्यापारी अरविंद वीर, अशोक भळगट, वैभव शिंदे, सिद्धार्थ गुगळे, निलेश भिंगे, आणि जळोची येथील फळे व भाजापाला आडतदार सुनिल होले, इम्रान बागवान, प्रशांत जंजिरे, संतोष बोद्रे , अक्षय चव्हाण व सुपे उपबाजार येथील आडतदार व खरेदीदार पांडुरंग चांदगुडे, रमणलाल तेली यांनी शेतमालाची खरेदी विक्री मध्ये उच्चतम काम केल्याने आणि भुसार, लिंबु, कांदा, फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी माऊली भापकर, रमेश यादव, सत्येंद्रराजे निंबाळकर, गणेश ढवाण, भिमराव लोखंडे, फत्तेशिंग गोंडगे, रेशीम कोष शेतकरी कुंडलिक वाघमारे या शेतकऱ्यांनी शेती मध्ये जादा उत्पादन व त्यांच्या शेतमालास जादा दर मिळाला असल्याने आणि समितीचे सेवक सुर्यकांत भगवान मोरे, निरीक्षक यांनी उत्कृष्ठ काम केल्याने तसेच हमाल बाळासो जाधव व मापाडी संभाजी शितोळे यांचे उत्कृष्ठ कामगिरीमुळे बारामती समिती तर्फे सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले. अशाप्रकारे खेळी मेळीत ही वार्षिक सभा संपन्न् झाली.
एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले. यावेळी पोपटराव गावडे, सचिन सातव, राजेंद्र गावडे, धनवान वदक, अशोक नवले, अशोकराव जगताप, अशोकराव मुळीक, वसंतराव तावरे, नारायण कोळेकर, अनिल आटोळे, बाळासो परकाळे तसेच समितीचे सदस्य विनायक गावडे, बापुराव कोकरे, रामचंद्र खलाटे, दयाराम महाडीक, सतिश जगताप, प्रतिभा परकाळे, शोभा कदम, शुभम ठोंबरे, विश्वास आटोळे, अरूण सकट, युवराज देवकाते, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितिन सरक आणि समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य तसेच शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि वि. का. संस्थेचे प्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी तसेच समितीचे सेवक उपस्थित होते. सभेचे आभार उपसभापती निलेश लडकत यांनी मानले.