तुळजापूर, 24 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात ड्रग्स विक्रीचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अमित ऊर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय 33, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर), युवराज देवीदास दळवी (वय 38, रा. पापनाश गल्ली, तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (वय 22, रा. शास्त्री चौक, नळदुर्ग, ता. तुळजापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी अंदाजे 2.25 लाख रुपये किमतीचे एकूण 45 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणाचा तपास धाराशिव पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिली माहिती
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका येथे स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान, गडद निळ्या रंगाच्या हुंडाई एक्सेंट कारमध्ये 3 जण संशयास्पदरीत्या आढळले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एमडी नावाचे ड्रग्स जप्त केले.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे किंमत 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे एकूण 45 ग्रॅम एमडी ड्रग्स, 7 लाख 50 रुपये किमतीची हुंडाई एक्सेंट कार 7,50,000 आणि 1 लाख रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन, असा एकूण 10 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अंमली पदार्थ विक्री, वाहतूक किंवा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अंमली पदार्थ विक्री आणि वाहतूक अशा बेकायदेशीर कृत्यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. युवकांनी अंमली पदार्थ व व्यसनांपासून दूर राहावे, कारण व्यसनाधीनता गुन्हेगारीकडे नेऊ शकते. अंमली पदार्थ हे समाजासाठी धोकादायक आहेत. नागरिकांनी अशा गोष्टींपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना दूर ठेवावे, असे आवाहन धाराशिव पोलिसांनी केले आहे.