पुणे, 16 मेः पुण्यातील बालगंधर्व सभागृहात आज, सोमवारी एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. सदर कार्यक्रमात तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी काही महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.
पुण्यातील बालगंधर्व सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या आहेत. स्मृती इराणी या सकाळीच पुण्यात आल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध आंदोलने केली आहे. महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इरानी यांनी बोलावे, अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट येथे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, फलक हातात घेऊन स्मृती इराणी विरोधात घोषणाबाजी केली. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला तेव्हा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व सभागृहात आधीच बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायल्या उठल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नलावडे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांने हात उगारला. यानंतर पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
‘मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिले नाही, त्यामुळे आम्ही बालगंधर्व सभागृहात शेवटच्या लाईनमध्ये जाऊन बसलो. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली, त्यानंतर आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा दिल्या. यानंतर भाजपमधील पुरुष कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पोलीस तिथे असतानाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही,’ अशी माहिती मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी दिली.