बारामती, 30 मेः बारामती तालुक्यातील सुपे- मोरगाव अष्टविनायक मार्गावर डायमंड चौक येथे भरघाव ट्रक हॉटेलमध्ये रविवारी (29 मे) रात्री शिरल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकने तीन व्यक्तींना चिरडले. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी आहेत.
दरम्यान, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक माहिती आहे. या अपघातात तीन व्यक्ती चिरडले गेले असून यात महिलेचा मृत्यू झाला. तर दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सुपे येथील ग्रामीण रुग्णालय व केडगाव साई दर्शन हॉस्पिस्टल येथे उपचारासाठी हालविण्यात आले.
सुपे- मोरगाव हा अष्टविनायक मार्ग चांगला बनवला गेल्याने विनाअडथळा वाहने प्रवास करत आहेत. मात्र यामुळे वाहन चालक बेभानपणे वाहने चालवताना दिसत आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या मार्गावर 3 अपघात झाले आहेत.
सुपे येथील या चौकाच्या नजीक गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थ करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या दुर्लक्षामुळेच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर अपघाताचे दिवसेंदिवस वाढत आहे. रस्ता अपघाताने आज अखेर अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी पोहचले. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे करत आहेत.