वर्धा, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) वर्धा जिल्ह्यातील तरोडा भागात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका कार व टँकरमध्ये झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक जोडपे व त्यांची दोन लहान मुले यांचा समावेश आहे. हा अपघात सोमवारी (दि.08) रात्री झाला. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (दि.09) दिली.
असा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कारने प्रवास करत होते. रात्री उशिरा तरोडा गावाजवळील महामार्गावर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, कारमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.
अपघाताचे कारण अस्पष्ट
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघाताचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा एका क्षणात अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.