दिल्ली, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील जनतेला महागाईचा झटका दिला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे आता महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोलच्या दरात सरासरी 3 ते 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. या निर्णयानंतर आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आजपासून जास्तीचे पैसे मोजावे लागतील. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे बजेट कोसळणार आहे.
3 ते 5 टक्क्यांची वाढ
तत्पूर्वी, ही टोलची दरवाढ 1 एप्रिल पासून लागू होणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोलची ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. तर लोकसभेच्या निवडणुका संपताच केंद्र सरकारने टोलच्या दरात सरासरी 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, देशातील राष्ट्रीय महामार्गावर अंदाजे 855 टोल प्लाझा आहेत, ज्यावर राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार टॅक्स वसूल केला जातो.
जनतेमध्ये नाराजी
भारतातील टोल टॅक्समध्ये दरवर्षी महागाई दरानुसार सुधारणा करण्यात येत असते. टोलच्या दरात आता वाढ झाल्यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तसेच या दरवाढीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासही आता महाग होणार आहे. दरम्यान, टोलचे दर वाढल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर या टोल दरवाढीला विरोधी पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.