पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी वाहतूक बदल

पुणे, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2025 रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पेरणे फाटा येथील आयोजित विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. त्यामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र. 60 वर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश पुण्याचे प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे

1. चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण –
या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद राहतील.
2. अहिल्यानगरकडून पुणे-मुंबईकडे जाणारी जड वाहने –
शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसरमार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.
3. पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने –
खराडी बाह्यवळणमार्गे हडपसरवरून पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गाने न्हावरा, शिरूर-अहिल्यानगर अशी वळवली जातील.
4. सोलापूर महामार्गावरून आळंदी व चाकणकडे जाणारी जड वाहने (ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक) –
हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.
5. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने (ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक) –
वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहिल्यानगरकडे जातील.
6. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप इत्यादी) –
वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील.
वाहतुकीतील हे बदल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील, अशी माहिती पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

वाहनतळ उभारण्यासाठी खासगी जमीन ताब्यात

पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येत असतो. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खासगी जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. ही जमीन 2 जानेवारी 2025 पर्यंत तात्पुरत्या वापरासाठी घेतली असून, त्यानंतर ही जमीन पुन्हा त्यांच्या मालकांकडे परत करण्यात येणार आहे. विजयस्तंभाजवळ होणारी वाहनांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम 65 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हवेली तालुक्यातील वढू खुर्द या गावात राहणाऱ्या अनिल रामचंद्र चोंधे आणि इतर काही शेतकऱ्यांच्या 3.03 हेक्टर जमिनीवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. ‘शेतकरी मिसळ’ च्या शेजारी असलेली ही जमीन प्रशासनाने वाहनतळाचा वापर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *