मुंबई, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र पोलीस दलातील 50 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले आहेत. त्यानूसार, अमितेश कुमार यांची पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे यापूर्वी नागपूर शहर पोलीस आयुक्त होते. तत्पूर्वी, रितेश कुमार हे पुण्याचे पोलीस आयुक्त होते. रितेश कुमार यांची आता मुंबईतील होमगार्डच्या महासमादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या!
या नवीन बदलीनुसार, रविंद्र कुमार सिंघल हे आता नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत. तसेच अमित गोयल यांची नागपूर शहर पोलीस उप आयुक्तपदी बदली झाली आहे. त्याचबरोबर एन. डी रेड्डी यांची आता अमरावती शहर पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. तसेच एम राजकुमार यांची सोलापूर शहर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एम राजकुमार हे यापूर्वी जळगांवचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
प्रवीण पवार हे पुण्याचे पोलीस सह आयुक्त
दरम्यान, पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी प्रवीण पवार यांची निवड झाली आहे. सोबतच पुणे शहर उप आयुक्तपदी हिम्मत हिंदुराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे शहर (उत्तर विभाग) अपर पोलीस आयुक्त पदी मनोज पाटील यांची निवड झाली आहे. तसेच रमेश चोपडे यांची आता पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर विशाल गायकवाड यांची आता पिंपरी चिंचवडच्या पोलीस उप आयुक्तपदी निवड झाली आहे. यापूर्वी, काकासाहेब आदिनाथ डोळे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त होते. त्यांची आता नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. तर हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.